Headlines

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘शेमारू मराठीबाणा’ वर झळकणार ‘आणि… डॅा. काशिनाथ घाणेकर’ !

हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असलेल्या ‘गुढीपाडव्या’वर यंदा जरी कोरोना व्हायरसचं सावट असलं तरी ‘शेमारू मराठीबाणा’ ही वाहिनी मात्र आपल्या प्रेक्षकांना घरबसल्या त्यांच्या आवडत्या सणाचा आनंद मनोरंजनाच्या माध्यमातून लुटण्याची संधी देणार आहे. साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या शुभदिवशी शेमारू मराठीबाणा वाहिनीवर ‘आणि… डॅा. काशिनाथ घाणेकर’ हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत मराठी तिकीटबारीवर तूफान व्यवसाय केलेला मराठी सिनेमा प्रसारीत केला जाणार आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी मराठीबाणा वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी जणू ‘आणि… डॅा. काशिनाथ घाणेकर’ सिनेमारूपी मनोरंजनाची गुढी उभारणार असल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
बुधवार २५ मार्च रोजी दुपारी १२.०० वा. आणि संध्याकाळी ७.०० वा. या वेळेत ‘शेमारू मराठीबाणा’ या वाहिनीवर ‘आणि… डॅा. काशिनाथ घाणेकर’ हा सिनेमा प्रसारीत केला जाणार आहे. मराठी सिने-नाट्यसृष्टीतील प्रतिभावंत कलाकार दिवंगत डॅा. काशिनाथ घाणेकर यांचा जीवनप्रवास ‘आणि… डॅा. काशिनाथ घाणेकर’ या सिनेमात उलगडण्यात आला आहे. डॅा. काशिनाथ घाणेकरांची लोकप्रियता, त्यांच्या वैयक्तिक तसंच व्यावसायिक जीवनात अचानक घडलेल्या काही घटना आणि मनाला चटका लावून त्यांचं निघून जाणं… या गोष्टींचा वेध या सिनेमात घेण्यात आला आहे.
अभिनेता सुबोध भावे याने या सिनेमात घाणेकरांची व्यक्तिरेखा साकारली असून, एका महान कलावंताच्या जीवनाचा चढता-उतरता आलेख पहाणं प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. याशिवाय या सिनेमात सुमीत राघवन आणि सोनाली कुलकर्णी यांच्याही भूमिका आहेत. सुबोधनं डॅा. घाणेकरांच्या जीवनातील विविध पैलू अत्यंत सुरेखरीत्या उलगडल्यानं प्रेक्षकांसोबतच सिनेसमीक्षकांनीही त्याचं कौतुक केलं आहे. इतकंच नव्हे तर कशिनाथ घाणेकरांच्या पत्नी कांचन देखील सुबोधचा अभिनय आणि दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांच्या कामावर खुश असून, घाणेकरांची नाटकं न पाहता तसंच प्रत्यक्षात त्यांना न पाहता केलेल्या कामाला विशेष दाद दिली आहे.
‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीवरील ‘महामूव्ही शोकेस’ अंतर्गत प्रसारीत केल्या जाणाऱ्या ‘आणि… डॅा. काशिनाथ घाणेकर’ सिनेमाचं औचित्य साधत सुबोध भावे म्हणाला की, एखाद्या चरित्रपटात (बायोपीक) काम करायला मिळावं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असल्यानं ‘आणि… डॅा. काशिनाथ घाणेकर’ सारखी दुसरी कोणती मोठी संधी असू शकत नाही. डॅा. घाणेकर यांचं व्यक्तिचित्र रुपेरी पडद्यावर रेखाटायला मिळणं हा माझ्या वर्तमान व्यावसायिक जीवनातील महत्त्वाचा क्षण आहे. माझे चाहते हा सिनेमा नक्की एन्जॅाय करतील याची खात्री आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘शेमारू मराठीबाणा’वर प्रसारीत होणाऱ्या या सिनेमात एका महान कलाकाराच्या रूपात मी प्रेक्षकांसमोर येणार आहे. काही दिवसांपूर्वीच सुरू झालेली ही वाहिनी गाजलेले सिनेमे प्रसारीत करण्यासाठी परिचयाची असून, माझे चाहतेही या वाहिनीवरील सिनेमांचा नक्कीच आनंद लुटतील.
‘शेमारू मराठीबाणा’ ही नुकतीच लाँच होऊनही अल्पावधीत लोकप्रिय झालेली, उच्च दर्जाचे मराठी सिनेमे, नाटकं प्रसारीत करणारी महाराष्ट्र-गोव्यातील स्वतंत्र मराठमोळी मनोरंजन वाहिनी आहे. या वाहिनीवर विशेषत: मराठी भाषिकांच्या आवडीचे सिनेमे प्रसारीत केले जात असून, आजतागायत मराठी सिनेसृष्टीतील बऱ्याच सुपस्टार्सच्या सिनेमांनी मराठी रसिकांचं मनोरंजन केलं आहे. सणासुदीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी रसिकांना गाजलेल्या सिनेमांची मेजवानी देण्यासाठी ‘शेमारू मराठीबाणा’ ही वाहिनी कटिबद्ध आहे. ‘शेमारू मराठीबाणा’ ही वाहिनी फ्री-टू-एअर असून, टाटा स्कायवर १२३० एलसीएन, एअरटेल डिजीटल टीव्हीवर ५३१, डिश टीव्हीवर ४०१६, डिजीटल मुंबईवर ५२५, डिजीटल नाशिकवर ५२०, जीटीपीएलवर ४७४, स्कॅाड१८ वर ४६८ आणि डीडी फ्री डिशवर प्रेक्षकांचं मनोरंजन करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *