Headlines

ज्योतिबाच्या यात्रेत सासनकाठी घेऊन नाचणारा हा पोलीस आहे तरी कोण जाणून घ्या !

काही दिवसांपुर्वीच ज्योतिबाची यात्रा जल्लोषात पार पडली. गुलाबी रंगात न्हाऊन निघालेली ही ज्योतिबानगरी पाहण्यास दूरदूरहुन आलेल्या लोकांची गर्दी झाली होती. त्यामुळे जिथे गर्दी तिथे महाराष्ट्र पोलिस हे हमखास असतातच. असं म्हणतात कि सततचे बंदोबस्त ,पहारे यामुळे पोलिसांना त्यांचे आयुष्य नीट हवेतसे जगता येत नाही. त्यांच्या आवडीनिवडी जोपासता येत नाही. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हीडीओ व्हायरल होत आहे.

या व्हिडीओत एक पोलिस ज्योतिबाच्या यात्रेत सासन काठी नाचवताना दिसत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी देखील पसंती दाखवत त्या पोलिसाचे कौतुक केले आहे. या पोलिसाचे नाव रवींद्र माळी असे आहे. त्यांचे मुळगाव कुरुंदवाड आहे पण त्यांची पोस्टींग कोल्हापुर येथे झाली आहे. ते पोलिस मुख्यालयात काम करतात.

कोरोनामुळे ही यात्रा गेली दोन वर्षे बंद होती मात्र यावेळी सरकारने निर्बंध उठवल्यामुळे या वर्षी ही यात्रा जल्लोषात साजरी केली गेली. लाखो भाविक या यात्रेला सहभागी होते. परंपरेने साजरी केली जाणाऱ्या या यात्रेत सासनकाठी नाचवण्याची परंपरा आहे.वेगवेगळ्या गावच्या सासनकाठ्या इथे नाचवल्या जातात.

गुलाल खोबऱ्याची उधळण, हलगीचा ठेका आणि जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात इथं सासनकाठ्या नाचवल्या जातात. रवींद्र माळी तिथे बंदोबस्तावर असताना त्यांना ही मिरवणुक दिसली व ती काठी स्वता नाचवण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही याबद्दलचा अनुभव त्यांनी स्वता सांगितला.

“माझी काठी समोरून येताना दिसली. माझे वडील भाऊ, मित्र गावकरी सगळे उत्साहात काठी नाचवत येत होते. कधी एकदा ती काठी हातात घेऊन खांद्यावर नाचवेन असं झालं होते. जेव्हा काठी समोर आली तेव्हा मात्र मी स्वतःला रोखू शकलो नाही. सगळ्यांच्या सोबत देहभान विसरून सासनकाठी नाचवली. पोलिसाचा गणवेश अंगावर होता अन् मनातून देवाची भक्ती होती. सगळ्यांचा आग्रह झाला आणि मी क्षणात सासनकाठी डोक्यावर घेत तोल सांभाळत सासनकाठी नाचवली. सासनकाठी नाचवण्याचा मोह आवरला नाही.”

त्यांचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला याबद्दल सुद्धा त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले.”त्या दिवशी बंदोबस्तासाठी डोंगरावर होतो. त्या आधी कोल्हापूरमध्ये पोटनिवडणूक होती. आंबेडकर जयंतीसाठी सगळीकडे पोलीस बंदोबस्तावर असावं लागत होतं. त्यामुळं कामाचा ताण सगळ्याच पोलिसांवर होता. पण सासनकाठी समोर दिसली आणि हा ताण कुठे गेला कळलंच नाही.”

“हे सगळं करताना याचा कुणीतरी व्हिडिओ करेल आणि तो वायरल होईल हे ध्यानीमनी सुद्धा नव्हतं. पण आता खूप आनंद होतोय. लोक फोन करुन, मेसेज करुन अभिनंदन, कौतुक करतात यामुळं भारी वाटतंय.” सासनकाठी नाचवताना तोल सांभाळण्यावरुन अनेकांनी तुम्ही हे कसं केलं असं विचारल्यावर ते सांगतात, “लहानपणापासून सासनकाठी नाचवताना पाहत आलोय. ते पाहूनच शिकलो. त्यात काही वेगळं वाटत नाही. माझ्यासाठी ते सवयीचं आहे. ”

रवींद्र माळी यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास महाराष्ट्र पोलीस दलातून वेटलिफ्टिंग प्रकारात त्यांनी सुवर्णपदकासह अनेक पदकांची कमाई केली आहे. राष्ट्रीय खेळाडू असल्याने त्यांना व्यायामाची आवड आहे. ते सांगतात,”वयाच्या 12 व्या वर्षापासून व्यायाम करतो. सध्या नोकरीची वेळ ही सकाळी आठ ते संध्याकाळी आठ अशी आहे.

नोकरीतून वेळ मिळाल्यावर व्यायाम करतो. मी निर्व्यसनी असल्याने स्वतःच्या तब्येतीबाबत जागृक असतो. माझी वर्दी माझ्या अंगावर शोभून दिसावी यासाठी मी प्रयत्नशील असतो.” त्यांना शेतीची व व्यायामाची आवड आहे. ही आवड ते मुलांना देखील जोपसायला लावतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !