Headlines

‘लागीरं झालं जी’ मालिकेतील ‘जीजी’ म्हणजेच ‘कमल ठोके’ याचे या कारणामुळे दुःखद निधन; कमल ठोके यांच्यावर आज कराडमध्ये अंत्यसंस्कार !

अल्पावधीतच झी मराठीवरील ‘लागिर झालं जी’ ही सैनिकाच्या जीवनावर आधारित मालिका प्रसिद्ध झाली होती. प्रेक्षकांना त्या मालिकेतील सर्वच पात्र फार भावली होती. आज ही त्या मालिकेतील एकूण एक पात्र प्रेक्षकांच्या लक्षात असेलच यात काही वादच नाही.

अजिंक्य, शीतल, मामा, मामी, जयश्री, राहुल, विक्रम यांच्यासोबत अजून एक महत्त्वाचं पात्र होतं ते म्हणजे जिजी. आपल्या नातवावर जीवापाड प्रेम करणारी एक अडाणी आजी म्हणजे जिजी असं ते पात्र होतं. सत्तरी पार झालेल्या या जिजीच खरं नाव कमल गणपती ठोके.

शनिवारी आपल्या लाडक्या याच जिजींच कर्करोगाच्या आजाराने निधन झालं. त्यांच्यावर बंगळुरू येथे उपचार सुरू होते. काल १४ नोव्हेंबरला सायंकाळी त्यांचे निधन झाले. सर्वांवर माया, प्रेम करणाऱ्या या जिजी काळाच्या पडद्याआड झाल्या.

कमल ठोके यांनी वयाची ३३ वर्षे शिक्षिका म्हणून काम केले. शिक्षणाची आवड असल्याने त्यांनी १० नंतरचे शिक्षण रात्रीच्या शाळांमध्ये जाऊन पूर्ण केले. मग यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून एम ए चे शिक्षण पूर्ण केले. सोबतच अध्ययन क्षेत्रात शिक्षण पूर्ण करत त्या शिक्षिका म्हणून रुजू झाल्या.

त्यांचे पती गणपती ठोके हे देखील शिक्षक होते. २००५ साली मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त होत, आदर्श शिक्षिका देखील ठरल्या त्यांच्या कार्याबद्दल सातारा जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते मिळाला होता.

इतकेच नव्हे तर लहानपणापासून अभिनयाची आवड जोपासत अनेक दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी मराठी चित्रपटात काम देखील केले आहे. परंतु लागिर झालं जी मधील जिजी या भूमिकेने त्यांना खरी ओळख मिळाली.

सासर माहेर, सख्खा भाऊ पक्का वैरी, कुंकू झालं वैरी, भरला मळवट, बरड आम्ही असू लाडके, ना. मुख्यमंत्री गावडे अशा अनेक चित्रपटात त्यांनी महत्वाच्या भूमिका केल्या.

‘लागिर झालं जी’ मधील ‘जिजी’ ही भूमिका अगदी त्यांच्यासाठीच बनली होती असं त्या म्हणाल्या होत्या, त्या घरी जशा त्यांच्या नातवासोबत हसत बोलत तसंच त्या सेटवर ही भूमिका साकारत, असं देखील त्या म्हणाल्या. त्यांच्या जिजी या भूमिकेसाठी त्यांना फेव्हरेट आजीचा पुरस्कार देखील मिळाला.

श्रीमती ठोके यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे, मुलगी असा परिवार आहे. श्रीमती ठोके यांचे पार्थिव दि. 15 नोव्हेंबर 2020 रोजी कऱ्हाडला सकाळी 6 वाजता मंगळवार पेठ कमळेश्वर मंदिर येथील निवासस्थानी आणणात येणार आहे. अंत्यदर्शनानंतर अंत्यविधी कमळेश्वर मंदिर शेजारील स्मशानभूमीत सकाळी 10 वाजता होणार आहे.

आपल्या आयुष्यातील सर्वच भूमिका म्हणजे एक स्त्री, पत्नी, शिक्षिका, अभिनेत्री लिलया पार पाडणाऱ्या लाडक्या कमल ताई म्हणजेच जिजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!