गेली अनेक वर्षे झी मराठीवरील चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमातील सूत्रसंचालक निलेश साबळेने श्रेया बुगडे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके आणि सागर कारंडे या कलाकारांना घेऊन मालिकेची भट्टी चांगलीच जमवली.
सुरुवातीला केवळ 18 दिवसांसाठी करायचा ठरलेला हा शो 9 वर्षे उलटून गेली तरी प्रेक्षकांना अजूनही खळखळून हसवत आहे. दरम्यानच्या काळात या शोमध्ये अनेक बदल झाले. काही नवे कलाकार या शोमध्ये सहभागी झाले तर काही जूने सोडून गेले. मध्यंतरी या शोने परदेश दौराही केला होता.
आता या शोबद्दल एक नाराज करणारी बातमी समोर आली आहे. झी मराठीच्या इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यात पोस्टमन काकांच्या पत्रवाचनाच्या सेशनमध्ये सागर कारंडे दिसत नाहीये. या शोमध्ये सागर कारंडेचा एक विशेष चाहता वर्ग होता. त्याने साकारलेले पोस्टमन काका, पुणेरी बाई या भूमिका खूप गाजल्या. दिड तास खळखळून हसवणाऱ्या या शोमध्ये पोस्टमन काकांची भूमिका करुन सागर कारंडे प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणून त्यांना काही मोलाचे संदेश द्यायचा.
पण अलिकडेच पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओत पत्र वाचनाच्या सेशनमध्ये सागर कारंडेच्या ऐवजी अभिनेत्री श्रेया बुगडे पत्र वाटत आहे. सागरच्या जागी श्रेयाला पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. श्रेया ते पत्र एखाद्या कवितेप्रमाणे वाचून दाखवत आहे.
View this post on Instagram
सागर कारंडे वाचत असलेलं पत्र मनाला भिडायचं, कुठे आहेस सागर कारंडे?, सागर कारंडेने चला हवा येऊ द्या का सोडलं?, श्रेया तुझ्या आवाजात सागरसारखा गंभीरपणा नाही, अशा कमेंट्स सध्या त्या व्हिडिओला येत आहेत. चला हवा येऊ द्या’सोबत ‘इंडियाज लाफ्टर चॅम्पियन’ या कार्यक्रमातदेखील सागरने काम केलं.
त्यानंतर त्याने ‘चला हवा येऊ द्या’मधून एक्झिट घेतली. पण तरीही काही भागांत तो दिसून आला. आता त्याने पूर्णपणे हा कार्यक्रम सोडला असून त्याची जागा श्रेया बुगडेने घेतली असल्याचे म्हटले जात आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार, ‘चला हवा येऊ द्या’मधील सर्वच विनोदवीर ‘पत्र वाचन’ हा सेगमेंट करणार आहेत.