Headlines

‘नथीचा नखरा चॅलेंज’ आहे सोशल मीडिया वरती ट्रेंडिंग, काय आहे तो जाणून घ्या !

सध्या देशभरात लॉक डाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे. या लॉक डाऊन मुळे सर्वजण घरात बंदिस्त झाल्यामुळे प्रत्येक जण विरंगुळ्यासाठी नवीन उपाय शोधून काढत आहेत. या विरंगुळ्यासाठी सोशल मीडिया सर्वांसाठी देवासारखा धावून आला असे म्हणण्यास हरकत नाही. कारण या सोशल मीडिया मुळेच सध्या लोक एकमेकांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेले काही दिवस सोशल मीडियावर वेगवेगळ्या चॅलेंजेस चा पाऊस पडत आहे.
तसे पाहायला गेले तर लॉक डाऊन च्या आधीही वेगवेगळे चॅलेंजेस सोशल मीडियावर फिरत होते. मात्र आता या चॅलेंजेस मध्ये अनेक जण उत्साहाने सहभाग घेत आहेत. समस्त स्त्रीवर्गाला नटण्या मुरडण्याची खूप हौस असते.‌ लग्न समारंभ असो किंवा इतर कोणताही कार्यक्रम छान नटून थटून त्या समारंभात वावरण्यात स्त्रियांना एक वेगळाच आनंद मिळतो. मुळात शृंगाररस हा स्त्रियांना नेहमीच आवडीचा विषय आणि या शृंगार रसातील अलंकार म्हणजे स्त्रियांसाठी हळवा कोपरा !
सध्या बाजारात नखशिखांत सजता येईल असे सर्व दागिने उपलब्ध आहेत. हे सर्व दागिने परिधान केल्यावर स्त्रीचे सौंदर्य खुलून येते. त्यात जर तुम्हाला एखादा दागिना घालून दाखवा असे चॅलेंज कोणी दिले तर कोणाला नाही आवडणार!
सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे चॅलेंज म्हणजे नथीचा नखरा ! या नथीच्या चॅलेंज मध्ये स्त्रियांचा उत्साह अगदी ओसंडून वाहत आहे. सोशल मीडियावर प्रत्येक स्त्री ही तिच्या मैत्रिणींना किंवा परिवारातील सदस्यांना या नथीचे चॅलेंज देत आहे. मग त्या स्त्रिया नथ घातलेला फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून त्यामध्ये इतर स्त्रियांना नॉमिनेट करत आहेत. पुढे हीच साखळी सुरू राहिल्याने संपूर्ण सोशल मीडिया स्त्रियांच्या नथ घातलेल्या फोटोंनी भरला आहे.
सध्या सोशल मीडियावर नथीचा नखरा या चॅलेंज चा जोरदार ट्रेण्ड चालू आहे. बाकदार नाकात नाजूक नथ स्त्री ला नेहमीच साजून दिसते. त्यामुळे सध्या व्हाट्सअप, फेसबुक , इंस्टाग्राम वर नथ घातलेल्या मुलींचे किंवा स्त्रियांचे फोटो पाहण्यात एक वेगळीच मजा येत आहे. हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी काही मुली किंवा स्त्रिया त्यांचे जुने नथ घातलेले फोटो पोस्ट करत आहेत तर काही खास चॅलेंज पुर्ण करण्यासाठी साडी वगैरे नेसून त्यावर नथ घालून हौशीने स्पेशल फोटोशूट सुद्धा करत आहेत. या नथीचा नखरा चॅलेंज मुळे संपूर्ण सोशल मीडियावर मराठी बाणा अगदी खुलून दिसत आहे.
नथीच्या नखरा या चॅलेंज सोबतच ओपन हेअर चॅलेंज, साडी चॅलेंज, डालगोना कॉफी चॅलेंज, फिर मुस्कुरायेगा इंडिया या टॅगलाइन सोबत स्वतःचा एक हसरा फोटो पोस्ट करण्याचा ट्रेण्ड या सर्व ट्रेण्डची चलती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *