Headlines

लहानपणी पाहिलेलं स्वप्न विमानात उडायचं, ते पूर्ण झालं नाही म्हणून घरच बांधलं विमानासारखं !

प्रत्येकाच्या मनात आपले घर कसे असावे याची रुपरेषा तयार असते. ते साकारण्यासाठी प्रत्येकजण झटत असतो. काहींचे ते साकार होते तर काहींना त्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतात. याहून वेगळे म्हणजे काहींना सगळ्यांपेक्षा काहीतरी नवे करुन दाखवायची इच्छा असते. त्यासाठी ते आपली आयडियाची कल्पना अगदी जोरदार लढवतात. सध्या सोशल मीडियावर असेच एक उदाहरण व्हायरल होत आहे.

आयुष्यात एकदा तरी विमानातून फिरण्याची प्रत्येकाची इच्छा असते. पण ते प्रत्येकालाच शक्य होत नाही. आपण पाहिलेले स्वप्न पूर्ण नाही झाले तर ती रुखरुख आयुष्यभर लागून राहते. अशाच एका व्यक्तीचे विमानातून फिरायचे स्वप्न अधुरं राहिलं. पण ते त्याने वेगळ्या अंदाजात पूर्ण केलं.

विमानात बसण्याचं स्वप्न एका व्यक्तीने आपल्या घराच्या रुपात पूर्ण केले आहे. त्या व्यक्तीने विमानासारखं दिसणारं हूबेहुब घरं बांधलं आहे. म्हणजेच आता ती व्यक्ती केवळ विमानातून उडत नाही, तर आता विमानात राहतेसुद्धा. चला त्या व्यक्तीबद्दल अधिक जाणून घेऊया.

ही व्यक्ती व्यवसायाने मजूर आहे, तो कंबोडियाचा रहिवासी असून त्याचे नाव क्रख पोव आहे. या व्यक्तीने विमानासारखे दिसणारे आपले स्वप्नातले घर बांधले आहे. क्रखने बांधलेल्या या घरात दोन बेडरूम आणि एक बाथरूमसुद्धा आहे. तो स्वतः गवंडी काम करतो. हे आगळेवेगळे घर बांधण्यासाठी त्याला सुमारे 20,000 डॉलर्स म्हणजेच साधारण १७ लाख रुपये खर्च आला.

घराबद्दल क्रखने सांगितले की, मला घरात राहायला खूप आवडते. जेव्हा मी घरात असतो तेव्हा मला विमानात बसल्यासारखे वाटते. माझी विमानातून फिरायची खूप इच्छा होती. पण ती पूर्ण होऊ शकली नाही. म्हणून माझे घरच विमानासारखे बांधले. त्याचे घर सध्या गावातील आकर्षणाचा विषय बनला आहे. ते पाहायला दूरदूरहून लोक येतात.