संसारवेल ही नवराबायकोने मिळून फुलवायची असते. पण चुकून कधी या वेलीवरील एक जरी फूल गळून पडले तरी त्या संसाराचे होत्याचे नव्हते होते. आपल्याकडे विधवा विवाहास अजूनही फारशी मान्यता नाही. विधवा स्त्रीचा विवाह करायचा म्हटले की समाजातील लोकांच्या नजरा टवकारतात.
अशातच जर त्या स्त्रीचे वय जास्त असेल किंवा तिची मलं मोठी असतील तर त्या बाईला म्हातरचळ लागले की काय अशी दुषणे देऊ लागतात. पण या सर्व प्रथांना अपवाद ठरेल अशी घटना कोल्हापूरातील हेरवाड गावात घडली आहे.
कोल्हापूरात राहणारे नारायण आणि रत्ना यांचा पंचवीस वर्षांपूर्वी सुखाचा संसार चालू होता. लग्नानंतर दोन वर्षांनी त्यांना युवराज हा मुलगा देखील झाला. नारायण नोकरी करायचे तर रत्ना या घरकाम करायच्या. सर्व सुरळीत चालू असताना दोन वर्षांपूर्वी नारायण यांचा अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे अचानक रत्ना यांचे आयुष्य नैराश्येने ग्रासले. पतीची साध अर्ध्यातच सुटल्याने त्यांना असह्य होऊ लागले. त्यांची दिवसेंदिवस कोलमडणारी स्थिती त्यांचा मुलगा युवराजला पाहावली नाही.
आई विधवा झाल्यावर तिला मिळणारी वागणूक तसेच आईचा एकांत घालवण्यासाठी त्याने एक वेगळाच निर्णय घेतला. युवराजने आईचे दुसरं लग्न लावण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यासाठी त्याने आईला योग्य असा नवरा शोधायला सुरुवात केली. तेव्हा त्याला त्याच्याच भावकीतला एक शेतकरी नातेवाईक आठवला. ते सुद्धा एकट्यानेच त्यांचे जीवन जगत होते. त्यांच्याकडे त्याने आपल्या आईसोबत लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला. आणि आईला देखील लग्नाबद्दल सांगितले. सुरुवातीला दोघांकडून नकारच होता. मात्र मुलाच्या हट्टामुळं शेवटी आई लग्नाला तयार झाली.
आता पुढचा प्रश्न होता समाजाचा. पण जेव्हा युवराजच्या आईने शेजारी तसेच पाहुण्यांच्या कानावर ही गोष्ट घातली तेव्हा त्यांच्याकडूनही या लग्नाला होकार मिळाला. सर्वांच्या साक्षीने युवराजने आपल्या आईचे लग्न नात्यातीलच एका काकांशी लावून दिले. युवराजच्या या धाडसाचे संपूर्ण कोल्हापूरात कौतुक होत आहे.
पत्नीच्या निधनानंतर पुरूष लग्न करू शकतो, तर पतीच्या निधनानंतर पत्नीला दुसरं लग्न करायला काय हरकत आहे असे मला सतत वाटायचे. हेच मी माझ्या आईला समजावले. असे युवाराजने सांगितले.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !